मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाची श्रीलंकेविरुद्ध मालिका आटोपल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. परंतु स्पर्धेच्या आधीच चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला चेन्नईच्या संघाने या लिलावात १४ कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले होते. परंतु दीपकच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे दीपक श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने बुधवारी दिली. वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दीपकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. एक पथक त्याच्या फिटनेसवर नजर ठेवून आहे. आता तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहून तंदुरुस्त होणार आहे.
दीपक चाहर याच्या पायाची मांसपेशी दुखावली गेली असून, ती दुखापत गंभीर आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दीपकची दुखापत जास्त गंभीर दिसून आली आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खेळणाऱ्या एकूण दहा संघादरम्यान पात्रता फेरीत ७० सामने खेळले जाणार आहेत. या सर्व संघांदरम्यान होणाऱ्या ७० पैकी ५५ सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती क्रिकबज या क्रीडा संकेतस्थळाने दिली आहे.