नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रख्यात आंतरराष्ट्रिय शेफ विष्णू मनोहर यांनी नाशिकमध्ये आपला सोळावा जागतिक विक्रम केला आहे. आज, रविवार, १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र मिलेट्स मिशन, नाशिक भगर मिल असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात त्यांनी तब्बल ४ हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घातली. आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स मधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड झाला असून, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध ठिकाणी याची नोंद घेतली गेली आहे. तशी माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रत्यक्ष भगर बनविण्याचा आनंद घेतला. नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया, उमेश वैश्य, अशोक साखला, पारस साखला, पियुष बोरा, अखिल राठी, दिपक राठी, मोहनलाल चोरडिया यांनी सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
अशी होती भगरची खास रेसिपी
भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर ४०० किलो, बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो, तेल १२५ किलो, पाणी २७०० लिटर , जिरा १२ किलो, शेंगदाणे १०० किलो, शेंगदाणे कूट १२५ किलो, दही ४०० किलो, ५०किलो, तूप १०० किलो, दूध १०० लिटर आदी साहित्य वापरून ४ हजार किलो भगर शिजविण्यात आली.
युनेस्को ने २०२३ हे वर्ष मिलेट्स ( तृणधान्य ) वर्ष म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. भारत तृणधान्य उत्पादनात आघाडीवर आहे. युनेस्कोच्या या उपक्रमात तृणधान्य प्रचार आणि प्रसार च्या बाबतीतही भारताला सर्वोच्च स्थान आहे. तृणधान्यमधील जीवनसत्व , शुद्धता आणि धान उत्पादकांचा फायदा नजरेसमोर ठेवून भारत अनेक उपक्रमातून याचा प्रचार प्रसार करणार आहे. नाशिकची भगर भारतात प्रसिद्ध आहे . तिचा अधिक प्रसार व्हावा म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनने पुढाकार घेऊन महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .
जागतिक रेकॉर्ड
एकाच वेळी ४ हजार किलो पेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवून लोकांना मोफत वाटण्यात आली. हे तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड होणार आहे. आंतरराष्ट्रीय सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध पंधरा रेकॉर्ड केले असून, नाशिक मधील हे त्यांचे १६ वे जागतिक रेकॉर्ड आहे. याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्स मध्ये केली जाणार आहे.
नागपूरहून विशेष कढई
४ हजार किलो भगर एकाचवेळी शिजवण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. त्या कढईचे वजन सुमारे दीड हजार किलो असून, १० बाय १० फूट व्यास आणि ५ फूट उंच आहे. त्यासाठी ३ प्रकारचे २२ किलो वजनाचे मोठे चमचे ही तयार करण्यात आले आहेत.
मोफत भगर वाटप
आज, रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा भगर शिजवण्याच्या या उपक्रमास सुरुवात झाली. सकाळी ११ पर्यंत भगर शिजवून तयार झाली. यानंतर ती नागरिकांना मोफत वाटण्यात आली. काही भगर नाशिकमधील अनाथालये , वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात आली.
Chef Vishnu Manohar World Record Bhagar Millet