नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – पेट्रोल, डिझेलचे भाव प्रचंड वाढल्याने सध्याच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे, त्यातच भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर दिशेने वेगाने वाढ होत आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे, विशेषत: दुचाकी वाहनांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात आणत आहे. आपण देखील इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, परंतु महाग मॉडेल्स खरेदी करू इच्छित नसाल, तर सुमारे 30 ते 40 हजार रुपये किंमतीमध्ये स्कूटर मिळू शकेल. यातील चार प्रकारच्या ई स्कूटरची माहिती जाणून घेऊ या…
हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा
या स्कूटरची किंमत 55,580 रुपये आहे. यात Hero Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर 1200W इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V/30Ah पोर्टेबल बॅटरीसह देण्यात येते. तसेच कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 82 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. स्कूटरचा टॉप स्पीड 42kmph आहे.
अँपिअर V48
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 37,390 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 48 V, 20 Ah बॅटरी असून ती पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50 किलोमीटरपर्यंत चालते. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. तसेच ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 8 ते 10 तास लागतात.
उजास इगो
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,880 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 250W मोटर आणि 48V-26Ah बॅटरी असून ती बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. याबाबत कंपनीचा दावा आहे की, बॅटरी फुल चार्ज केल्यावर त्याची ड्रायव्हिंग रेंज 60 किमी आहे. तसेच यात डिजिटल स्पीडोमीटर, अँटी थेफ्ट अलार्म, समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन, मागील बाजूस हायड्रोलिक सस्पेन्शन आणि अलॉय व्हील यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
एव्हॉन ई लाइट
यापूर्वी सायकलसाठी प्रसिद्ध असलेली एव्हॉन ही कंपनी आता या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. याची किंमत 28,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. विशेष म्हणजे या हलक्या वजनाच्या स्कूटरमध्ये 48V – 12AH बॅटरी असून ती पूर्णपणे चार्ज केल्यावर सुमारे 50 ते 60 किलोमीटर चालते. या स्कूटरचा टॉप स्पीड 24 किमी प्रति तास आहे. तसेच ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.