मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ही सेवा नागरिकांना महसुलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात विभाग यशस्वी झाला आहे. आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
सातबाराच्या संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून उत्तरे मिळणार आहेत. भविष्यात या सेवेमध्ये एआयचा वापर करता येईल का याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले.
‘महाभूमी’ संकेतस्थळावर ७/१२, ८-अ, ई-चावडी, ई-हक्क, फेरफार अर्ज स्थिती, पीक पाहणी, आणि महा भू-नकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच, नागरिक या संकेतस्थळावर ७/१२ पाहू शकतात, ७/१२ डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थिती तपासू शकतात.
डिमिस्टिफायिंग लँड रेकॉर्ड्स’ (भूमी अभिलेखांचे गूढ उकलणे) या संकल्पनेअंतर्गत ही ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा माहिती, सुविधा आणि सूचना या तीन तत्त्वांवर आधारित आहे. ‘भूमित्र’ चॅटबॉटमध्ये जमीन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी २७३ प्रश्नांचा संच तयार करण्यात आला आहे.