इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या २४ तासांत चारधाम यात्रेतील सात भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारांमुळे यात्रेकरुंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत चारधाम यात्रेत ५६ जणांना जीव गमवावा लागला असून त्यापैकी ५४ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे.
बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन जोशीमठला परतलेले भानुभाई आणि त्यांचा मुलगा नत्ताभाई यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी त्याला जोशीमठ येथील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचवेळी बद्रीनाथ धाम येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गुजरात येथील महिला यात्रेकरू वीणा बेन (वय ५५) यांची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सीएमओ डॉ. एसपी कुडियाल यांनी सांगितले की, हे मृत्यू हृदयविकाराने झाल्याचीच शक्यता आहे.
दुसरीकडे केदारनाथमध्ये दोन प्रवाशांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सीएमओ डॉ. बीके शुक्ला यांनी सांगितले की, पुणे येथील रहिवासी प्रदीप कुमार कुलकर्णी (वय ६१) आणि गडचिरोलीतील बंशी लाल (वय ५७) यांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ यात्रेत आतापर्यंत एकूण २३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २२ प्रवाशांना हृदयविकाराचा झटका आला आहे. याशिवाय ऋषिकेशमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चारधाम यात्रेवरून परतलेल्या अवधेश नारायण तिवारी (वय ६५) मुलगा शिवप्रसाद तिवारी याची प्रकृती मुनिकेरती येथील गंगेत स्नान केल्यानंतर बिघडली.
त्याचवेळी मध्य प्रदेशातून आलेल्या २२ प्रवाशांच्या टीममधील सौरम बाई (४९) पत्नी अमर सिंह या रहिवासी पीपलदा धार यांची प्रकृती बिघडली. दोघांना एसपीएस रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसरीकडे उमेशदास जोशी (५८) मुलगा विठ्ठलदास राघव जोशी, एका बसजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या सगळ्या ह्रदयविकाराच्या घटनांमागे नेमकं काय कारण ठरलं याचा अभ्यास डॉक्टरांकडून केला जात आहे.