इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चारधाम यात्रेवर जाणाऱ्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याच्या घटनांची दखल पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) घेतली आहे. गेल्या सात दिवसांत यात्रेवर गेलेल्या २१ भाविकांच्या मृत्यूंबद्दलची माहिती पंतप्रधान कार्यालयाने मागविली आहे. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने रात्री उशिरा उत्तर पाठविले आहे. यामध्ये भाविकांच्या मृत्यूच्या कारणांसह यात्रेच्या मार्गांवर आरोग्यसेवेसंदर्भात सरकारकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेच्या तपशीलाचा समावेश आहे. चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याच्या माहितीचाही समावेश आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधाम यात्रेसाठी सध्या भाविकांची गर्दी होत आहे. यामध्ये सर्व वयाच्या भाविकांचा समावेश आहे. यात्रेच्या पहिल्या सात दिवसांमध्ये २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्व मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. यातील १४ भाविकांचा मृत्यू गंगोत्री आणि यमुनोत्री धामला जाताना झाला आहे. या यात्रेच्या मार्गावर आरोग्य सुविधांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
भाविकांच्या वाढत्या मृत्यूच्या आकडेवाडीवर मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला पत्र पाठवून त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आरोग्य सचिव राधिका झा यांनी पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठविला आहे. यात्रेच्या मार्गावर ऑक्सिनची कमतरता असल्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आगाऊ प्रतिसाद पथकासह ठिकठिकाणी प्रथम वैद्यकीय प्रतिसाद पथके गठित करण्यात आली आहेत. उत्तरकाशीमध्ये हृदयविकारावर प्रतिसाद देणारी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.