इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात गाजलेल्या चारा घोटाळाप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. यादव यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या घोटाळ्यातील ३८ दोषींना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून अनधिकृतरित्या तब्बल १३९.३५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. रांची सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस के शशी यांच्या न्यायालयात आज दुपारी बारा वाजेपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांना क्रमाक्रमाने शिक्षा सुनावण्यात आली. दोषींना कारागृहातूनच न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय होताच लालू प्रसाद यांच्यासह ३८ जणांना कारागृहात पाठवण्यात आले. लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे त्यांना कारागृह प्रशासनाकडून रिम्स येथे दाखल करण्यात आले आहे.
शिक्षा सुनावलेल्या दोषींमध्ये माजी आमदार आर के राणा आणि पशुपालन विभागाचे माजी सचिव बेक ज्युलियस यांचा समावेश आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १५ फेब्रुवारीला लालू प्रसाद यांच्यासह ७५ आरोपींना दोषी मानले होते. त्यापैकी ३८ जणांना कारागृहात पाठवण्यात आले. न्यायालयाने दोषी असलेल्या ३५ आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पन्नास हजार ते दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तीन वर्षांची शिक्षा मिळालेल्या दोषींना अपिल करण्यासाठी त्याच दिवशी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. याच प्रकरणात न्यायालयाने सात महिलांसह २४ आरोपींची मुक्तता केली होती. या प्रकरणात ९९ आरोपी होते. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि के एम प्रसाद यांनी रिम्समधून शिक्षेसाठी ऑनलाई हजर झाले. सीबीआयचे विशेष न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार असल्याने बिरसा मुंडा केंद्रीय कारागृहाकडून ऑनलाइन सुनावणीची व्यवस्था करण्यात आली.
https://twitter.com/ANI/status/1495676726781054981?s=20&t=gl-Y7wSeaMmMzrkcnH3Zgg