नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर १५ सप्टेंबर पासून चारधाम यात्रा २०२५ साठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली चारधाम सेवांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने कठोर तपासणीनंतर धोरणात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सुरक्षेतील कोणत्याही त्रुटींसाठी शून्य सहनशीलतेच्या स्पष्ट आदेशासह, डीजीसीएला कठोर उपाययोजनांचा अवलंब करण्याचे तसेच सुरक्षित सेवा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डीजीसीए, एएआय, राज्य सरकार आणि उत्तराखंड नागरी हवाई वाहतूक विकास प्राधिकरण (यूसीएडीए) यांच्यातील निकट समन्वय सुनिश्चित करण्यासाठी मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमवेत डेहराडून आणि दिल्ली येथे अनेक आढावा बैठका घेतल्या.
मंत्र्यांच्या निर्देशांनुसार, डीजीसीएने १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान डीजीसीए पथकाद्वारे सर्व हेलिपॅड, हेलिकॉप्टर, ऑपरेटर्सची तयारी आणि सहाय्यक सुविधांची व्यापक तपासणी/परीक्षण देखील केले. त्यानंतर यूसीएडीए आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना हेलिकॉप्टर उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली.
याव्यतिरिक्त, सर्व सहभागी हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि वैमानिकांना डीजीसीएने यातील आव्हानांबद्दल माहिती दिली, हेलिकॉप्टरच्या तीर्थयात्रा उड्डाणांसाठी संबंधित परिपत्रकात स्वीकारलेल्या अतिरिक्त सुरक्षा उपायांबद्दल माहिती दिली.
उत्तराखंडच्या उंच आणि दुर्गम भागात असलेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेकरूंची सुलभ वाहतूक करण्यामधील हेलिकॉप्टर सेवांची महत्त्वाची भूमिका ओळखून डीजीसीएने सुरक्षित आणि सुरळीत कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी वाढीव सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. डीजीसीए चारधाम यात्रा हेलिकॉप्टर उड्डाणांवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवेल.