चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा प्रश्नावर प्रांत कार्यालयासमोर प्रहार संघटनेने प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालत घोषणाबाजी करत ट्रॅकरमध्ये बसून कार्यकर्ते प्रांत कार्यालयाजवळ पोहचले. कांद्याला किमान ५०० रुपये क्विंटल अनुदान द्यावे, जोपर्यंत १२०० रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत अनुदान मिळावे, बाजार समित्यांमध्ये अवांतर व नियमबाह्य खर्चावर आळा घालावा. जिल्ह्यातील बाजार समिती मध्ये सरासरी भावात ३०० ते ५०० रुपयांचा फरक होतो तो होता कामा नये अशा विविध मागण्या करण्यात आल्या. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सध्या कांद्याचे दर घसरत असल्याने शेतक-यांमध्ये संताप आहे. याअगोदर लासलगाव, नांदगाव व नाशिकमध्ये कांदा प्रश्नांवर आंदोलन झाले. त्यानंतर याची दखल विधानसभेत घेण्यात आली. पण, तरी कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे. त्यामुळे अजूनही ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे.