इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कळवण तालुक्यातील चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने आश्रमशाळेत तिसरी वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित बागुल असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. रोहितच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडला होता.
दरम्यान या घटनेनंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्याध्यापक बाळाजी भुजबळ व आश्रम शाळेचे अधीक्षक संजय नांदणे यांना निलंबित केले आहे. मुख्याध्यापक हे कार्यालयात अनुपस्थित होते. तर अधीक्षक हे या काळात रजा टाकून गायब होते. दोन दिवसांपासून रोहितची प्रकृती बिघडली होती. परंतु योग्य वेळी वैद्यकिय मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या घटनेनंतर पालकांनी शाळेसमोर मोठ्या संख्येने जमून संताप व्यक्त केला. रोहितच्या मृत्यूस दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा दिला आहे.