नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवडच्या तलाठी कार्यालयातील खासगी कामगार मदतनीस लाच घेताना सापळ्यात अडकला आहे. रवींद्र कारभारी मोरे (वय ४२) असे लाचखोराचे नाव आहे. तो पाथरशेंबे, पोस्ट हिवरखेडे, तालुका चांदवड येथील रहिवासी आहे. आणि तो चांदवडच्या तलाठी कार्यालयात खाजगी कामगार मदतनीस म्हणून कार्यरत आहे.
अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ने दिलेल्या माहितीनुसार, कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या नावे ५० गुंठे जमीन विकत घेतली होती. गाव नमुना ७/ गट क्रमांक ४०९ अन्वये सदरील सातबारा उताऱ्यावर नाव लावायचे होते. यामोबदल्यात हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे बिलाची रक्कम २९४० रुपये बक्षिस स्वरूपात लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीकडे तर्रार करण्यात आली.
याप्रकरणी लाचखोर मोरेवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे, चा. पो. शि. परशुराम जाधव यांचा पथकामध्ये समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे आणि पोलीस उपअधीक्षक
नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, एसीबीने आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे एसीबीने म्हटले आहे.
Chandwad Talathi Office ACB Trap Bribe Corruption