मधूर गुजराथी
चांदवड – तालुक्यातील खडकजांबला स्मशानभुमीच्या वादामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळल्याची घटना घडली. गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न येथे चिघळला आहे. या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु असल्याने दोन स्मशानभुमी असून रस्ता नसल्याने हा वाद मिटत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संतप्त होत मृतदेह आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळला.
शुक्रवारी खडकजांब येथील आदिवासी तरुण अमोल अशोक कोकाटे (२५) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर जाळला. या प्रश्नावर अगोदर काही नागरीकांनी स्मशानभुमीला रस्ता नसल्याने उपोषण केले. तहसीलदार कार्यालय व वरिष्ठाकडे दाद मागितली. नंतर हा प्रश्न न्यायालयात गेला. पण, तो प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृतदेह जाळण्यात आला. यावेळी सरपंच पुजा अहिरे, उपसरपंच नाना गुंजाळ, ग्रामसेवक अजय पुरकर व ग्रामपंचायत सदस्यांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळू नये अशी विनंती केली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी अखेर मृतदेह ग्रामपंचायती समोरच जाळल्याने काही काळ वातावरण चांगले तापले होते.