चांदवड – चांदवड मर्चन्ट बॅकेच्या निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी गेलेले पत्रकार महेश मधुकर गुजराथी यांना चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी धक्काबुकी केली. गुजराथी हे मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर गेले असता निवडणुक अधिकारी पी.एस.पाटोळे यांच्या समक्ष बारवकर यांनी आपण मध्ये येऊ शकत नाही असे सांगितले. त्यानंतर गुजराथी यांना बारवकर यांनी धक्काबुक्की केली. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, शिवसेनेचे नेते जगन्नाथ राऊत यांनी मध्यस्ती केली. मात्र पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मतदान केंद्रावर कॉँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. बाजीराव रकिबे यांच्याशी दुपारी समीर बारवकर यांनी हुज्जत घातली. अशा प्रकारे त्यांची वागणुक असेल तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, तालुका अध्यक्ष विजय काळे व चांदवड तालुका पत्रकार संघाने जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे व वरीष्ठ पोलीस अधिका-यांकडे केली.