मधूर गुजराथी
चांदवड – येथील एका आदिवासी वस्तीतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह व एकलव्य संघटनेने पोलीसांच्या मदतीने रोखला. १७ वर्षे आठ महिने वयाच्या मुलीचा आई वडीलांनी गरीब परिस्थिती व पैशांची निकड असल्यामुळे बालविवाह करण्याचे ठरविले होते. ही गोष्ट चांदवड येथील एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक बाळासाहेब किसन गांगुर्डे, भरत माळी, संभाजी गुंजाळ व नेते व कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरचा बालविवाह पोलिसांच्या मदतीने रोखला.
चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने संबधीतांना बोलावून हा बालविवाह थांबविला. चांदवड येथील एका आदिवासी वस्तीतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह हा ८ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याची बातमी एकलव्य संघटनेचे बाळासाहेब गांगुर्डे, भरत माळी, संभाजी गुंजाळ, सदाभाऊ गोधडे, बारकु गांगुर्डे, राजु सोनवणो, संजय पवार, सोमनाथ माळी, नवनाथ गोसावी, दशरथ माळी, बारकु गांगुर्डे , मच्छिंद्र गांगुर्डे आदिना मिळाली. त्यांनी तातडीने चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना एक निवेदन दिले व बालविवाह रोखण्याची विनंती केली. दरम्यान या अल्पवयीन मुलीची धुळे येथील वयाने दुप्पट वयाच्या इसमाबरोबर विवाह करण्याची बाब उघडकीस आली. यात मोठी एंजटाची टोळी असल्याचे एकलव्य संघटनेचे म्हणणे असून संबधीतावर त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने बालविवाह रोखण्यास प्रतिबंध केले.