चांदवड- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदवडच्या वतीने रासायनिक खतांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात केलेली दरवाढ तातडीने कमी करुन पुरेसा साठा उपलब्ध करुन देणेबाबत चांदवड तहसीलदारांना ऑनलाइन निवेदन देण्यात आले. राज्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉक डाऊन केल्याने शेतातील शेतमाल हा बे – भावाने विकावा लागत आहे. यातुनहीं सावरत शेतकऱ्यांनी खरीपाच्या मशागतीची कामे सुरु केलेली आहे. पेरणीसाठी लागणारी खते – बी – बीयाणे याची खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र केद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत ६०० ते ७०० रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांसमोरील समस्यांमध्ये भर पडलेली आहे. जुन महिन्यात मध्यावधीत अथवा अखेरीस मशागतीपुर्वी शेतकरी परेणीच्या वेळी अडचण येवू नये म्हणून अगोदर खरेदी करुन ठेवतात. मात्र ऎन खरीपाच्या हंगामात डीपीए सोबत इतर सर्वच मिश्र खतांच्या किमती दीडपटीने वाढल्या आहेत. तसेच खताच्या किंमतीसोबत तणनाशक, किटकनाशक यांच्या भावात देखील किमतीत वाढ झालेली आहे. तरी शेतकरी हिताचा विचार करता केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या संभाव्य किमती केलेली भरमसाठ वाढ कमी करुन खतांना पुरेसासाठा उपलब्ध करुन द्यावा. खतांच्या किंमतीत झालेली दर वाढ कमी करण्यात यावी याबाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सुनिल कबाडे, चांदवड शहर अध्यक्ष प्रकाश शेळके, जिल्हा संघटक रिजवान घासी, युवक कांग्रेस शहर अध्यक्ष रुपम कोतवाल,नगरसेवक नवनाथ आहेर, विध्यार्थी शहर अध्यक्ष राहुल एलिंजे, शहर उपाध्यक्ष किशोर शेलार, ग्राहक संरक्षण समितीचे तुकाराम सोनवणे,नगरसेवक अल्ताफ तांबोळी, सरचिटणीस कैलास सोनवणे आदींनी केली आहे.