चांदवड – नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कुलदैवत असलेल्या चांदवडच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची चांदवडला भेट दिली. यावेली वंचितांच्या गरिबांच्या आणि महिलांच्या लढाईसाठी बळ मिळण्यासाठी रेणुका देवीला त्यांनी साकडे घातले.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी युवा मोर्चाची अध्यक्ष असताना युवा मोर्चाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मुंडे साहेबांसोबत चांदवडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले होते .माझ्या कार्यक्रमासाठी मुंडे साहेब प्रमुख अतिथी म्हणून आले होते. चांदवडची रेणुका देवी आमचे कुलदैवत असून साहेबांच्या निधनानंतर गेली सात वर्षे दर्शनाला येणे झाले नाही. योगायोगाने दौऱ्याच्या निमित्ताने आज योग जुळून आला. महिलांसाठी,गोरगरिबांसाठी व वंचितांसाठी जी लढाई मुंडे साहेबांनी सुरू केली होती ती लढाई लढण्यासाठी मला बळ मिळो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मला योगदान देता यावं अशी प्रार्थना यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील आघाडी सरकार जावं व भाजपचे सरकार यावे असे साकडे घातले का ? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ,’असे साकडे मी देवाला घालत नाही. या गोष्टी देवाला सांगायच्या नसतात त्या आपण कमवायच्या असतात असेही त्या मिश्कीलपणे म्हणाल्या. माध्यमांनी जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले पाहिजे वाढत्या महागाई वर बोलताना त्या म्हणाल्या की, सरकारला काही निर्णय राष्ट्रीय व अंातरराष्ट्रीय बाजारपेठेच्या चढ उतारानुसार घ्यावे लागतात. यामुळे थोडासा त्रास जनतेला होत असेल तर तो भरून काढण्याची क्षमता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे आहे.
चांदवडच्या अहिल्यादेवी ट्रस्टच्या वतीने मॅनेजर सुभाष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चांदवडचे जेष्ठ नेते अशोककाका व्यवहारे यांनी केले. याप्रसंगी जयकुमार रावळ,चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,सुभाष पवार,अशोककाका व्यवहारे, प्रशांत ठाकरे,महेश खंदारे,निलेश काळे,विशाल ललवाणी,नितीन खांगळ आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.