चांदवड – गेल्या दोन वर्ष संपूर्ण जगात कोरोना महामारीची पार्श्वभूमी, अनेक कुटुंबावर झालेले आघात लक्षात घेता त्या कुटुंबांना पुढील काळात उभारी घेता यावी त्यात ग्रामपंचायतीचा हातभार असावा याच भावनेतून ज्या कुटुंबातील सदस्य कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले असतील त्या कुटुंबाची एक वर्षासाठीची घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच देशाच्या सीमेवर आपल्या जीवाची पर्वा न करता भारतमातेची सेवा करणाऱ्या सर्व आजी माजी सैनिक बांधवांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव सुद्धा करण्यात आला. सौंदाणे ग्रामपंचायत कोरोना काळात विविध उपक्रमाद्वारे गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होती. सर्व नागरिकांच्या सहकार्याने आपण कोरोनाला थोपवू शकलो. यापुढेही लसीकरण मास्क सॅनिटीझर या त्रिसूत्रीचा वापर करून पुढील काळात पण कोरोनावर मात करू असे मत यावेळी सौंदाणे ग्रामपंचायत सरपंच डॉ. मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.