चांदवड – येथील डावखर नगर मधील राहिवाशांनी चांदवड नगर परिषद प्रशासनाच्या कामाचा धिक्कार करीत पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केले शोले स्टाईल आंदोलन. दिवाळी सारखा मोठा सण जवळ येऊनही येथील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पंधरा दिवसात एकदाच पाणी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठीच पंचाईत झाली असून नगर परिषद कुठलीच उपाय योजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये परिषदेच्या कामकाजाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.कुठलेच नगरसेवक,राजकीय पुढारी या प्रश्नाला वाचा फोडत नसून येणाऱ्या काळात मतदान करताना याचा नक्कीच विचार करू असे सांगत डावखर नगर येथील नागरिकांनी चांदवड नगर परिषदेचा धिक्कार करीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनही केले. चांदवड पोलिसांनी वेळीच मद्यस्थी करून हे आंदोलन थांबवले असले तरी प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. नगर परिषद सदस्य मीनाताई कोतवाल यांनीही याप्रसंगी भेट देऊन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी गोकुळ देवरे, ईश्वर देवरे,संतोष देवरे,सोमनाथ पवार,ऍड. हांडगे,सी.जे.पगार सर,व्ही.बी.देवरे सर,राजेंद्र देवरे,दीपक पवार,दीपक हांडगे,विनोद मोरे,योगेश बोरसे आदींसह परिसरातील अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.
कोणाचे लक्ष नाही
दिवाळीचा सण जवळ आल्याने चांदवड नगरपरिषदेने अतिशय सुंदर असे नियोजन केलेले आहे.या सुंदर नियोजनाचे चांदवड मधील जनतेने स्वागत केलेले आहे. नियोजन म्हणजे शहरातील सुरळीत पाणीपुरवठा हा पाणीपुरवठा पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो संपूर्ण वर्षभरात आठ ते दहा दिवसांनी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच महिन्यातून तीन ते चार वेळेस वर्षातून ४० ते ४८ वेळेस पाणी जनतेला मिळते. अशा या सुंदर नियोजनाचे आपण संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी दंड व्याजासह का भरावी ?. व नगरपरिषदेने ही जनतेला दंडव्याज का लावावे ? असा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पाण्याविषयी विचारणा केली असता त्यांचे नेहमीचे उत्तर मोटर जळाली , टाकीत पाणी नाही , पाईपलाईन फुटली, आम्ही काय करणार असे असते या प्रश्नावर त्यांनी अजूनही उत्तर शोधले नाही. डावखरनगरमध्ये आज तेरा दिवस झाले पाणी नाही. याकडे कोणाचे लक्ष नाही.
-संतोष केदारे,रहिवासी डावखर नगर,चांदवड.