चांदवड– येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ८६ विद्यार्थ्यांची ३.५ लाख व त्यापेक्षा जास्त पॅकेज साठी निवड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बायज्यूज, इन्फोसिस, एल अँड टी इन्फोटेक, माइंड ट्री यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्यूद्वारे निवड झाली आहे. या कंपन्यांतर्फे पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरुवातीला एप्टीट्यूड टेस्ट, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच आर राऊंड झाला. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती.
याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी सांगितले की, या निवड प्रक्रियेतून कंप्यूटर इंजीनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनिअरिंग मधून एकूण ८६ विद्यार्थ्यांची निवड झाली. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याची काळजी महाविद्यालयानी घेतली. ऑनलाइन पद्धतीने विविध प्लॅटफॉर्मचा वापर करीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योगजगताला अपेक्षित कौशल्य त्यांच्यात रुजवली जात आहेत. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात, त्या अनुषंगाने कंपन्यांना अपेक्षित संवाद, तांत्रिक, तार्किक, बुद्धिमत्ता क्षमता, बॉडी लॅंग्वेज, टीम वर्क, सर्जनशीलता, व्यवस्थापन व नैतिक मूल्य इत्यादीसारखे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, सेमिनार इत्यादीचे आयोजन वर्षभर सुरू असते.
तसेच उद्योग जगतात सुरू असलेले बदल अंगी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक माहिती होण्यासाठी तसेच उद्योग जगताची खोलवर माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढीस लागून त्यांची कौशल्ये वृद्धिंगत होतात. पुस्तकी ज्ञान आणि प्रात्यक्षिक ज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. आपण काय शिकत आहोत, त्याचा उद्योग जगतात काय उपयोग आहे, तसेच अजून काय करायला हवं याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर नियुक्त होत आहेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची निवड प्रक्रिया सुरु झाली असून पात्र विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे. येत्या काही कालावधीत अनेक नामांकित कंपन्यांचे ड्राईव्ह होणार आहेत. शिक्षण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा,उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलालजी भंडारी, सुनीलकुमारजी चोपडा, प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे ,उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.