चांदवड – येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर रेमडेसिवीरच्या नावाखाली कुठलेतरी द्रव विकत असलेल्या एक जणांला तीन बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक जण फरार झाला आहे. चांदवड पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चांदवड येथील चांदवड शहर शिवसेना प्रमुख व ओम साई मोबाईल शॉपचे संचालक संदीप मधुकर उगले यांना चांदवड ग्रामीण रुग्णालयाच्या गेटवर दोन संशयित रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असल्याचे लक्षात आले. त्यांना संशय आल्याने संदीप उगले यांनी ही बाब चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सांगितली. यावेळी आरोपी किरण सुभाष साळवे (वय ३३) मनमाड व रोहित घरते यांच्याकडून असलेल्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर भादवी कलम ४२० व ३४ दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी किरण साळवे यास ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर ,पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस करीत आहेत