चांदवड-” माझी शेती माझा सातबारा, मीच लिहीणार, माझा पीकपेरा ” या उपक्रमांतर्गत ई – पिकपहाणी मोबाईल अॅपद्वारे करण्याबाबत चांदवड तालुक्यात तहसिल कार्यालय येथील सभागृहात तहसिलदार प्रदिप पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, महसुल नायब तहसिलदार , बी.व्ही. खेडकर, राहुल राठोड, महसुल सहा. प्रदीप गुंजाळ, तांत्रिक सहा. तसेच सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व कृषी मंडळ अधिकारी चांदवड यांची उपस्थिती होती. सदर प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर म्हणुन तलाठी संवर्गातील योगेश देसले व श्रीमती भारती रकीबे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रात्यक्षिक केले. तालुक्यातील शेतकऱ्यांना आता ई – पिकपहाणी या अॅपद्वारे पिकांची माहिती भरता येणार आहे. यामध्ये आपल्याच शेतातील पेरलेले पिकाच्या नोंदणी बरोबरच शेतातील झाडे, फळझाडे, खरीप तसेच रब्बी हंगामातील पेरलेली पिके, विहिर पड, कायम पड ई. गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्या शेतातच उभे राहून मोबाइलने जिओ टॅग वापरुन ई – पिकपहाणी या अॅपवर पिकाची नोंदणी करता येईल. सदर शासनाच्या मीच लिहीणार, माझा पीकपेरा या उपक्रमाचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांनी आवाहन केले आहे.