चांदवड – तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयचे शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातून पूरग्रस्त भागातील परिवारांना मदतीचे आवाहन केले आहे. पूरग्रस्त उदध्वस्त परिवारास सढळ हाताने मदत करूया….या मदतयज्ञात दानशुरांनी यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या फलक रेखाटनाबाबत हिरे यांनी सांगितले की, एक काळ रात्र ,निसर्गाचे रौद्र रूप,वरूणराजाचे थैमान आणि पहाता पहाता होत्याचं नव्हतं झालं. कोरोनातून सावरता सावरता महापुराचं संकट अनेक कुटुंबाच्या उरावर कोसळलं आणि अनेकांच्या जीवणाचा खेळ खल्लास झाला. कोल्हापूर, सांगली,सातारा,रायगड,क्षेत्रातील अनेक परिवार महापुरामुळे बेघर झाली, अनेकांच्या संसाराचा चिखल झाला. काडी काडीने जोडलेला संसार डोळ्यादेखत पाण्यासह वाहून गेला. माणसं ढिगाऱ्याखाली जिवंत गाडली गेली. हजारो जित्राब प्राण्यांचा बळी गेला. शिल्लक राहिलं फक्त हृदय सुन्न करणारं दृष्य आणि हंबरडा फोडणारा टाहो. संकटाला सामोरे जाण्याची व संकटकाळात साथ देण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मग संकट देशाच्या कोणत्याही भागात असो. संकटकाळी भक्कम पणे उभे राहून साथी हात बढाना ही आपली रीत आहे. त्यामुळे फलक ऱेखाटून मी हे मदतीचे आवाहन केले आहे.