चांदवड: येथील नॅक मानांकित ‘ अ ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळाव्यास मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवून गेले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे व यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती यांनी माजी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की महाविद्यालयाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे होत आलेल्या प्रगतीत तुमचे फार महत्त्वाचे योगदान आहे.
महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या नामांकित क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावत आहे. या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळते. संकेत पवार, प्रतिक भावसार कौस्तुभ कहाते, ऋषिकेश बागुल, सागर ठाकरे व इतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निघणाऱ्या जागांविषयी माहिती दिली. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये कशाप्रकारे बदल घडू शकतो याची माहिती दिली. काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना अक्षरशः भारावून गेले. विशेष म्हणजे एवढ्या धावपळीच्या वातावरणात रिषभ चोपडा हे माजी विद्यार्थी जर्मनी येथून हजर होते. मेळाव्याचे आयोजन प्रा. वाय. एस. कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. यु. पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलालजी भंडारी व सुनीलकुमारजी चोपडा आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.