चांदवड- सध्या सगळीकडे शिक्षण व वर्क फ्रॉम होम साठी इंटरनेट, मोबाईल रेंज ची गरज लक्षात घेता वाय फाय सुविधा शहरात उपलब्ध होणेबाबत चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना भारतीय मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकारी हरप्रित बाजवा महिला व विद्यार्थीनी यांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आज जगभरात पसरलेली महामारी कोविडमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यू मुळे घरातून बाहेर निघून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले आहे. अशा काळात देशातील,राज्यातील व चांदवड शहरातील सुद्धा विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्काईप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ॲप आहेत ज्यांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण दिले जाते. यात विद्यार्थी आपापल्या घरी बेडरूम किंवा स्टडी टेबल वर बसून लॅपटॉप अथवा मोबाईल च्या सहाय्याने शिक्षण मिळवू शकतात.
यात प्रमुख बाब म्हणजे चांदवड सारख्या डोंगराळ भागात इंटरनेट वापरणेसाठी मोबाईलची रेंज परिपूर्ण मिळत नाही. ज्यामुळे व्हिडिओ थांबून जातो,शिक्षणात शिक्षक जे सांगतात त्या पूर्ण संकल्पना मुलांपर्यंत पोहोचत नाहीत.ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. चांदवड शहरातून अनेक खाजगी नोकरदार जे बाहेर शहरात नोकरीस आहेत ते सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्यांनासुद्धा इंटरनेटची नितांत आवश्यकता आहे.
तसेच आपल्या परिवारातील जे नातेवाईक बाहेरगावी राहतात त्यांची खुशाली विचारणेसाठी व्हिडिओ कॉल केले जातात त्यात सुद्धा रेंज व्यवस्थित नसल्याने बोलण्यात व्यत्यय येतात. तरी नगरपरिषद ने wifi सुविधा चांदवड शहरात पुरवावी किंवा आणखी काही मोबाईल कंपन्या चांदवड शहरात चांगल्या इंटरनेट सुविधा निर्माण होणेसाठी मोबाईल टॉवर करणेस इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती केलेली आहे.तसेच वरील बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन नेटवर्क मध्ये सुधारणा होणे गरजेचे अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.सदर निवेदनाच्या पोलीस निरीक्षक व तहसीलदार साहेब चांदवड यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत. यावेळी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या हरप्रित बाजवा व महिला तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.