चांदवड- ज्याचा आहे वशीला त्यानेच जावे लशीला ही नवी म्हण अलीकडे व्हायरल होते आहे. चांदवडला लशीकरणात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे. चांदवडला कोरोना संपला की काय ? असा प्रश्न आता पडू लागला आहे.
चांदवड शहरातील उपजिल्हा रुग्णालय इमारतीत कोविड लशीकरण केंद्र सुरू आहे. सदरचे केंद्र जनता विद्यालयात असताना जागा भरपूर उपलब्ध होती. मात्र आता कमी जागेत खूप जास्त नागरिक रांगेत लशीकरणासाठी उभे असल्याचे चित्र आज होते. त्यामुळे येथील गर्दी चिंता वाढवणारी आहे.
या गर्दीवरून साहजिकच चांदवड मधील कोरोना संपला की काय ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. दोन पोलीस कर्मचारी सदरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असले तरी त्यांना मात्र ही गर्दी नियंत्रणात करता आली नाही.
शहरात फक्त १०० डोस उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात होते त्यामुळे मला लस मिळेल की नाही. यासाठी नागरिक ताटकळत उभे होते.तसेच काही नागरिकांनी शहरातील पत्रकारांना फोन करून याबाबत सांगितले व पत्रकार तेथे गेले असताना पोलीस कर्मचारी यांनी “तुमचे येथे काय आहे,चला इथून,नाहीतर आम्ही निघून जातो”असे उर्मटपणे बोलणेही सुनावले. त्यामुळे पत्रकारांनीही संताप व्यक्त केला.