चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड- देवळा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आहेर बंधूंचा दोन दिवसापूर्वी संघर्ष टळला असतांना रविवारी भाजपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर हा संघर्ष पुन्हा पेटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याअगोदर भाजप आमदार डॉ.राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. पण, त्यांचीच उमेदवारी पक्षाने घोषित केल्यामुळे आता आहेर बंधूमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या मतदार संघात डॅा. आहेर यांचे चुलत बंधू व नाफेडचे संचालक केदानाना आहेर यांच्या नावाची शिफारस डॅा. राहुल आहेर यांनी जाहीर केली होती. पण, केदा नाना आहेर यांचे नाव आले नाही. आता हा उमेदवारींचा घोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहचला असून ते काय तोडगा काढता याकडे सर्वांचे लक्ष आहे.
डॅा. राहुल आहेर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यामुळे केदा आहेर यांचा भाजपचे तिकिट मिळेल असे सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे आ.राहुल आहेर यांची मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केल्याचेही बोलले जात होते. पण, नेमकं काय घडलं हे अद्यापही समोर आलेले नाही.
कुटुंबात वाद होवू नये यासाठी निर्णय
कुटुंबात वाद होवू नये, कुटुंब एकसंघ राहावे यासाठी निर्णय घेतल्याची आ.राहुल आहेर यांनी तीन दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघा भावात तिकिटासाठी संघर्ष सुरू होता. डॉ.राहुल आहेर हे माजी मंत्री स्व. दौलतराव आहेर यांचे पुत्र असून ते सलग दोन वेळेस या मतदार संघातून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ही मोठी घोषणा केल्यामुळे मतदार संघात त्याची चर्चा आहे.