चांदवड – णमोकार तीर्थ चांदवड येथील पूज्य आचार्य देवनंदिजी महाराज गुरूभक्त परिवार व साधु वासवानी मिशन , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर आयोजित केले आहे . सदर कृत्रिम पाय व हात अद्यावत तंत्रज्ञानाने बनविलेले फायवरचे असून वजनास अत्यंत हलके मात्र टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते , सायकल चालवू शकते , टेकडी सुध्दा चढू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते . तरी सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे , गगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांना मोफत हात – पाय बसविण्यात येतील अशी माहिती चांदवड प्रथम नागरिक भूषण कासलीवाल यांनी दिली.
सदरचे शिबीर रविवार १८ जुलै २०२१ रोजी णमोकार तीर्थ , मुंबई – आग्रा हायवे नं.३ , मु . पो . मालसाने , ता . चांदवड , जि . नाशिक येथे सकाळी वेळ ठीक ९ .३० पासून दुपारी १ पर्यंत आयोजित केलेले आहे . यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोजमापे घेण्यात येतील व तयार झालेले कृत्रिम पाय व हात ३ ते ४ आठवड्यांनी मिळतील किंवा त्या आधी संबंधित व्यक्तीला संपर्क केला जाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले जाईल तसेच त्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा बोलविण्यात येईल व वाटप करण्यात येईल .