अजय सोनवणे
चांदवड – तालुक्यातील भाटगाव येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जयंतीनिमित्त फलक रेखाटन करुन त्यांना अभिवादन केले आहे. आधुनिक भारतीय चित्रकलेचे जन्मदाते, तैल रंग माध्यमात चित्र काढणारे प्रथम भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांची अोळख आहे.
जगभर ज्या हिंदूं देवी- देवतांच्या प्रतिमेची सर्वजण मनोभावे पूजा अर्चना करतात त्या हिंदूं देवी – देवतांना मनमोहक चेहरा व रूप त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून दिले आहे. केरळ मध्ये किलिमानूर शहरात २९ एप्रिल १८४८ रोजी राजा रवी वर्मा यांचा जन्म झाला. पौराणिक हिंदूं महाकाव्य व धर्मग्रंथावरील त्यांची चित्रे विशेष लोभस व आकर्षक आहेत. भारतीय साहित्य व संस्कृती मधील पात्रांचे आकर्षक चित्रण त्यांनी केले. महालात व संग्रहालयात उच्चभ्रू लोकांपर्यंतच् आपली चित्रे सिमित राहू नये व ती सर्व साधारण लोकांपर्यंत पोहचावीत म्हणून त्यांनी भारतात पहिली ‘ लिथोग्राफिक प्रेस ‘ सुरु केली. त्यात त्यांची चित्रे छापून सर्व घरापर्यंत पोहचली. मंदिरातील देवी – देवतांना बाहेर आणले व चित्र स्वरूपात प्रत्येक घरा घरा मध्ये स्थान प्राप्त करून दिले.
चित्रकलेत त्यांनी नवनवीन प्रयोग व अध्ययन केले. वडोदरा (गुजरात) येथील लक्ष्मीविलास पॅलेस संग्रहालयात त्यांची अनेक चित्रे संग्रहित आहेत. भारतीय चित्रकलेला विश्वामध्ये शिखरावर स्थान निर्माण करून देणाऱ्या चित्रकलेच्या या राजाला रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून देवर हिरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.