नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांद्रयान ३ हा महत्वाचा टप्पा असून, लवकरच चांद्रयान ४ आणि ५ मोहीम आखली जाईल,असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज घोषित केले. ते आज नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पूर्वावलोकन माध्यम संवादा दरम्यान बोलत होते.
२३ ऑगस्ट रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा,तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा दिवस,”राष्ट्रीय अंतराळ दिवस” म्हणून घोषित केला.
२३ ऑगस्ट २०२४ रोजी, नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस [NSpD-2024] साजरा करत आहे.‘चंद्राला स्पर्श करून जीवनाला स्पर्श: भारताची अंतराळ गाथा’, ही यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, गगनयान मिशन २०२५ मध्ये प्रथमच भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार असून, हे अभियान अंतराळ क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश म्हणून उदयाला येण्याचे भारताचे प्रयत्न अधोरेखित करेल.त्यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के त्रिपाठी यांच्याशी अलीकडे झालेल्या भेटीचा उल्लेख केला, आणि प्रामुख्याने क्रू मॉड्यूल रिकव्हरीसाठी भारतीय नौदलाबरोबरची इस्रोची भागीदारी अधोरेखित केली.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी,अंतराळ क्षेत्रातील भारताची झेप पाहण्याकरता श्रीहरिकोटा केंद्राचे दरवाजे जगासाठी खुले करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. हे केंद्र खासगी प्रक्षेपण केंद्र म्हणूनही कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले, २०३५ साला पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना , आणि २०४५ साला पर्यंत चंद्रावर भारतीय पाउल उमटवणे हे महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहेत.” गगनयान मिशन टीमला राकेश शर्मा मार्गदर्शन करत असल्याचे नमूद करून, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या.