इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इस्रोची चांद्रयान-३ मोहीम गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. इस्रोने आज माहिती दिली की चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेतील आणखी एक चक्राकार टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि आता तो चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चांद्रयान-३ ने आता चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे.
इस्रोने सांगितले की, चांद्रयान-३ चे थ्रस्टर १४ ऑगस्ट रोजी सकाळी १२.४५ वाजता सक्रिय झाले होते, ज्याच्या मदतीने चांद्रयान-३ ने आपली कक्षा यशस्वीरित्या बदलली. ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ ने प्रथमच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि तेव्हापासून ते तीन वेळा आपली कक्षा बदलून चंद्राच्या जवळ आले आहे. चांद्रयान-३ चंद्रापासून १५० किमी अंतराच्या कक्षेत १९०० किमी प्रति सेकंद या वेगाने प्रवास करत आहे. चांद्रयानचा परिभ्रमण टप्पा सुरू आहे आणि चांद्रयान-३ लंबवर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेत येऊ लागला आहे.
ही महत्वाची तारीख
१६ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ आणखी एक कक्षा कमी करून चंद्राच्या जवळ येईल. त्याच वेळी, १७ ऑगस्टचा दिवस मिशनसाठी महत्त्वाचा असेल कारण या दिवशी चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे केले जाईल. यानंतर २३ ऑगस्टला चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
चांद्रयान-३ मिशनमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. दुसरीकडे, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणाऱ्या किरणांचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे देखील कळेल.
Chandrayaan 3 Lunar Orbit Moon Success Circularization