मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर-गुळगाव येथील भूखंड अदलाबदल प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उपविभागीय अधिकारी, मालेगाव यांच्या निर्णयास अनुसरून अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी शेत जमीन अदलाबदल संदर्भातील आदेश व त्या आदेशान्वये घेण्यात आलेला फेरफार रद्द केला आहे. चुकीच्या कार्यवाहीबाबत संबंधित उप विभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात येत असून एक महिन्यात विभागीय चौकशी केली जाईल, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, जमीन अदलाबदल प्रकरणात तुकडे बंदी कायदा, ‘एमआरटीपी’ कायद्याचे उल्लंघन झाले असून सन २०१३ ते २०१९ या कालावधीत २५८ दस्त नोंदणी झाले आहेत. या अनधिकृत दस्त नोंदणीमध्ये या कालावधीत त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या आठ अधिकाऱ्यांची व दोन स्टॅम्प व्हेंडरची चौकशी केली जाईल. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाईल.