नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या श्वेता उमरे हीने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत अनेकांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गरीब घरातून आलेले, शिक्षणाच्या सुविधा अत्यंत प्रतिकुल असलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. परिस्थितीचा बाऊ न करता यश मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. श्वेता उमरे यापैकी एक आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील श्वेता बाबाभीम उमरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क २०२२ मुख्य परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालगावची विद्यार्थिनी आहे.
अभियंता ते अधिकारी असा प्रवास तिने पूर्ण केला आहे. पालगाव येथील श्वेता ही निवृत्त शिक्षक बाबाभीम उमरे यांची मुलगी आई गृहिणी. श्वेताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर येथून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथून घेतले. तर श्वेता इलेक्ट्रिकल अभियंता पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून पास झाली.
तालुक्यातून प्रथम
विशेष म्हणजे श्वेता वर्ग एक ते अभियांत्रिकी परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन तालुक्यातून प्रथम ठरली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क २०२२ ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. श्वेता ओपन मधून २४ तर अनुसूचित जातीतुन दुसऱ्या क्रमांकानी उत्तीर्ण झाली. श्वेता परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाबद्दल श्वेताने आई-वडील, शिक्षक वृंद, मित्र परिवार व कुटुंबीयांचे आभार मानले.
Chandrapur Shweta Umre MPSC Success Story ZP School