चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील चंद्रपूर शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी चंद्रपूर पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी आणि इतर चार जणांना अटक केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. त्यातच आता आणखी एक भयानक घटना समोर आली आहे पुतण्याने दगडाने ठेचून काकूचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथील ही घटना असून पुष्पा मधुकर ठेंगणे ( वय ६२ ) वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी धीरज ठेंगणे (वय २० ) याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी खून करुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुरांच्या गोठ्याजवळ
सोनापूरमधील पुष्पा ठेंगणे यांची सून काल दुपारी शेतातून परत येत होती. त्यावेळी आरोपी धीरज ठेंगणे याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. गुरांच्या गोठ्याजवळ काम करत असताना ओझे उचलण्याच्या बहाण्याने आरोपी धीरज ठेंगणेने पुष्पा ठेंगणे यांच्या सूनेला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करुन तिथून पळ काढला आणि घरी येऊन ही सर्व घटना आपल्या सासूला सांगितली. यामुळे संतापलेल्या पुष्पा ठेंगणे या पुतण्या धीरजला जाब विचारण्यासाठी गेल्या. मात्र यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यात आरोपीने काकूचा दगडाने ठेचून खून केला. तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घराशेजारच्या शेणाच्या खड्ड्यात टाकून आरोपी फरार झाला.
शेणाच्या खड्ड्यात
आपली आई अद्याप का परत आली नाही म्हणून पुष्पा यांच्या मुलाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या मृत पुष्पा ठेंगणे यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह शेणाच्या खड्ड्यात दिसला. त्याने याची माहिती पोंभुर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज गदादे करत आहेत. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.