नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. अत्यंत दिलदार आणि मनमिळावू स्वभावाचे धानोरकर अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आता त्यांचीही प्राणज्योत मालवली आहे.
धानोरकर यांना किडनीशी संबंधित आजार झाला होता. त्यावर उपचार सुरू होते. परंतु, तीन दिवसांपूर्वी त्यांना बरे वाटत नसल्याने नागपूरला भरती करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे एअर एम्बुलन्सने तातडीने दिल्लीला हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्य म्हणजे काल दुपारच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळले होते. त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळू यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर तसेच दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
वडिलांपाठोपाठ
बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर हे सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यामुळे घरात कुठलाच राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि आपले अस्तित्व सिद्ध केले. काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायणराव यांचे निधन झाले. त्यांना अग्निडाग देण्याचेही भाग्य बाळू धानोरकर यांना लाभले नाही. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्लीत हलविण्यात आले.
उद्या अंत्यसंस्कार
बाळू धानोरकर यांचे कुटुंबीय देखील त्यांच्यासोबतच दिल्लीत होते. आज (मंगळवार) दुपारी पर्यंत धानोरकर यांचे पार्थीव वरोरा येथे आणले जाईल. उद्या त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार केले जातील.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये
बाळू धानोरकर अनेक वर्षे शिवसेनेत होते. ते वरोरा मतदारसंघाचे आमदारही होते. पण २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील जुन्या खोडांमध्ये धमासान सुरू असताना पक्षश्रेष्ठींनी बाळू धानोरकरांचा पर्याय निवडला. धानोरकर शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
एकमेव काँग्रेस खासदार
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असल्यामुळे बाळू धानोरकर यांच्याबद्दल वेगळाच आदर दिल्लीत होता. दुर्दैवाने अत्यंत कमी वयात मृत्यू झाल्याने चंद्रपूरकर एका दमदार नेत्याला मुकले आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, १०१९मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. मात्र, अशा लाटेतही धानोरकर हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. महाराष्ट्रातून ते एकमेव काँग्रेस खासदार होते जे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत होते.
Chandrapur Congress MP Balu Dhanorkar Death