मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे गुरुवारी रात्री हा भीषण अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर मोठी आग लागली. तेवढ्यातच ट्रकचा टायर फुटल्याने आग आणखी भडकली. बघता बघता आगीनी रौद्र रुप धारण केले. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे टँकर आणि ट्रकमधील व्यक्ती अक्षरशः जिवंत जळाले. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. टँकर चालक हाफीज खान (अमरावती) आणि वाहक संजय पाटील (वर्धा) यांचा मृतांमध्ये समावेश होता. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जण अपघातात होरपळून मृत्यूमुखी पडले. ट्रकमधील सातही जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी आहेत. अपघात नेमका कसा घडला याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले होते.