मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिला.
पाटील म्हणाले की, आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. परंतु, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.









