हैदराबाद (आंध्र प्रदेश) – राजकीय नेत्यांना संकटे नवीन नाहीत. किंबहुना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील राजकारणाने ते इतके पोळून निघालेले असतात की त्यांनी एखाद्या संकटाविषयी काहीच वाटत नाही. मात्र, काही वेळा असा क्षण येतो की त्यांचा कणखरपणा बाजूला होतो आणि ते अतिशय हळवे होतात. असाच काहीसा प्रसंग माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या बाबतीत घडला आहे. भर पत्रकार परिषदेत ते ढसाढसा रडले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
‘गेल्या अडीच वर्षांपासून मी आंध्र प्रदेशमधील जनतेच्या भल्यासाठी अपमान सहन करत आहे, पण शांत राहिलो. परंतु आज ‘त्यांनी ‘ (माझ्या राजकीय विरोधकांनी) माझ्या पत्नीलाही लक्ष्य केले आहे. मी नेहमीच सर्वांचा आदर आणि सोबत उभा राहिलो आहे. यापुढेही मी आणखी आदर करेन. पण त्यांनी माझ्या पत्नीलाही रडवले, त्यामुळे आता हे सहन होत नाही.”अशी व्यथा मांडत तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनाही अश्रू अनावर झाले. इतकेच नव्हे तर सभापती तम्मिनेनी सीताराम यांनी माईक बंद केल्यावरही नायडू बोलत राहिले.
सत्तेत परत येईपर्यंत आंध्र प्रदेश विधानसभेत पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ एन. चंद्राबाबू नायडू यांनी घेतली. तसेच तोपर्यंत आम्ही जनतेमध्ये जाऊन त्याच्या समस्यांचे निराकरण करू, असे देखील त्यांनी टीडीपीच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू भावूक झाले आणि काही वेळ रडताना दिसले. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आपला सतत अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, वाईएसआरसीच्या जुलमी राजवटीविरुद्ध हे धर्मयुद्ध आहे. मी जनतेमध्ये जाऊन त्यांचा पाठिंबा घेईन. जर त्यांनी सहकार्य केले तर मी राज्य वाचवण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी, त्यांनी सभागृहात भावनिक स्वरात सांगितले की, सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून सतत शिवीगाळ होत असल्याने ते दुखावले गेले.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नायडू यांच्या वक्तव्याला ‘नाटक’ म्हटले. कृषी क्षेत्रावरील संक्षिप्त चर्चेदरम्यान सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. नंतर, त्यांची त्यांच्या पक्षाच्या आमदारांसोबत त्यांच्या चेंबरमध्ये अचानक भेट झाली, जिथे ते अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर माईक बंद करण्यात आला, त्यावेळी काही काळ वातावरण स्तब्ध झाल्यानंतर टीडीपी आमदारांनी नायडू यांचे सांत्वन केले, त्यानंतर ते सर्व आमदार पुन्हा सभागृहात परतले.
नायडू यांनी पत्रकारांसमोर आपला निर्णय जाहीर करताना सांगितले की, आपण सत्तेत परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही. तर दुसरीकडे त्यानंतर सभागृहात पोहोचलेले मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याचे वागणे आणि शब्द नाटकी आहेत. चंद्राबाबूंना प्रत्येक गोष्टीतून फक्त राजकीय फायदा घ्यायचा आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुर्वी आम्ही आमच्या बाजूने बोलताना त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संदर्भ नव्हता. सभागृहाच्या नोंदी हे स्पष्टपणे सिद्ध करतात. पण चंद्राबाबू स्वतःच अतिरेकी प्रतिक्रिया देत भावूक झाले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.