इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आता न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण अनिल देशमुख यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरी या प्रकरणातील पुरावे आयोगासमोर येऊ दिले नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न्या. चांदीवाल यांनी प्रसार माध्यमाला दिलेल्या या मुलाखतीमुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघेल. देशमुख आणि वाझे यांच्याकडून या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा गौप्यस्फोट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. शपथपत्रात वाझे यांनी अजित पवार आणि शरद पवारांची नावे घेतली; मात्र नाव घेण्यामागचे कारण ओळखून ती नावे मी रेकॉर्डवर घेतली नसल्याचे चांदेवाल यांनी म्हटले आहे. आयोगाच्या अहवालात ‘क्लीन चीट’ असा शब्दप्रयोगच नाही. उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत, अशी टिप्पणी या अहवालात केली असल्याचे न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे.
राज्यात गाजलेल्या या शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणातील वाझे, परमबीर सिंग आणि देशमुख हे एकमेकांना भेटायचे. त्यानंतर वाझे यांनी साक्ष फिरवली. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे सगळे सुरू होते. साक्ष पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. सत्य बाहेर येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अहवालामधील बाबी कोणत्याच सरकारच्या पचनी पडणार नसल्याचा दावादेखील न्या. चांदीवाल यांनी केला आहे.
या प्रकरणात वाझे यांनी दोन राजकीय व्यक्तिमत्त्वांची नाव घेतली होती. यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचा समावेश होता; मात्र ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझे यांना सांगितले. फडणवीस यांना गुंतवण्याचादेखील प्रयत्न वाझे आणि देशमुख यांनी केला; मात्र तेही मी रेकॉर्डवर घेतले नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते, असे मला काहीही होऊ द्यायचे नव्हते. राजकीय व्यक्तींना गुंतववून स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा वाझेचा प्रयत्न दिसत होता; मात्र मी तसे होऊ दिले नाही, असा दावा न्या. चांदीवाल यांनी केला आहे.
वाझे आणि परमबीर यांच्याकडे पुरावे होते; मात्र त्यांनी पुरावे असूनदेखील आपल्याला ते दिले नसल्याचा उल्लेख आपण अहवालात केला आहे. अहवालात पुरावा नसल्याचे न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये न्या. चांदीवाल यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आयोगाने आपल्याला ‘क्लीन चीट’ दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला गेला नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता; मात्र देशमुख यांचा हा दावा न्याय. चांदीवाल यांनी फेटाळला आहे.