विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ सीजन स्थगित केल्यानंतर उर्वरित सामने कधी आणि कुठे खळविले जाणार आहेत, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. स्पर्धेचे आयोजन पुन्हा भारतात केले जाईल की भारताबाहेर एखाद्या देशात आयोजन होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंमध्ये खेळविले जाऊ शकतात. आयपीएलचे उर्वरित ३१ सामने खेळविण्यासाठी इंग्लडकडे प्रस्ताव दिल्याची माहिती मिळाली आहे.
भारतात २९ सामने झाल्यानंतर स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने मंगळवारी ( ४ मे) आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या आपत्कालीन बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.
इंग्लिश काउंटीने इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्यास रस दाखविला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, एमसीसी, सर्रे, वार्विशायर आणि लंकाशायरने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले. त्यामध्ये आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळविण्याबाबत लिहिण्यात आले आहे. सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात हे सामने खेळविण्यासाठी एक आराखडाही पाठविण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघ या वर्षी इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान टिम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाकडे वेळ असणार आहे. त्यादरम्यान आयपीएलचे सामने खेळविले जाऊ शकतात. सामन्यांचे आयोजन करण्यामध्ये यूएईचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर यूएईमध्ये आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यूएईने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.