मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे पाच आमदार निवडून आले, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या देखील पाच उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे ती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे. जर महाविकास आघाडी सरकार सत्तेत कायम राहिले तर विधान परिषद निवडणुकीत नुकतेच विजयी झालेले दोन नेते मंत्री होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे राजकारणच सध्या ढवळून निघाले आहे. आता दिवसभरात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु त्याच वेळी महाविकास आघाडी सरकार टिकले तर विधान परिषदेतून निवडून आलेल्या आमदारांची पैकी दोघा जणांची तरी मंत्रीपदी वर्णी लागू शकते असे बोलले जात आहे. त्यात प्रामुख्याने माजी मंत्री एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांचे नाव घेतले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना २९ तर सचिन अहिर यांना २६ मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
सचिन अहिर का
कारण २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या बालेकिल्ल्यातून माघार घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेने त्यांना आता विधानपरिषदेचं तिकिट देत विधिमंडळात पुनर्वसन केले. त्यातच पुढील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी त्यांना मंत्रिपद देत वरळीकरांना आकर्षित करण्याचा शिवसेना नक्कीच प्रयत्न असेल. त्यामुळे लवकरच सचिन अहिर यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते.
म्हणून एकनाथ खडसे
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दशके राहिलेले आहेत. भाजपच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले. आता खडसेंचा अनुभव लक्षात घेता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. पक्ष सोडल्यापासून एकनाथ खडसे हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार सतत आरोप करत असतात. सध्या रिक्त असलेल्या दोन मंत्रिपदांपैकी एक पद एकनाथ खडसे यांना मिळू शकते.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपमधील एकेकाळचे सहकारी व मित्रांनी मला अतिरिक्त मदत दिली. मागील सहा वर्षांत माझी खूप छळवणूक झाली होती. ईडी वगैरे तपास यंत्रणा लावल्या. मंत्रिपदावर असताना खोटे आरोप करुन राजीनामा घेतला. ते सर्व आरोप खोटे ठरले, मात्र अजून छळ थांबलेला नाही. आता विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.