पुणे – आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र या पुस्तकात जीवनाच्या सर्व बाबींशी संबंधित अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीमधील नाते खूप पवित्र आहे. विश्वास आणि प्रेमामुळे हे नाते अधिक दृढ होते. या उलट पती-पत्नीमधील नात्यातील खोटेपणा आणि फसवणूकीमुळे हे नाते कमकुवत होऊ लागते.
आर्य चाणक्य म्हणतात की, जीवनात एकत्रितरित्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने पती-पत्नीला सहज यश मिळते. त्यामुळे या दाम्पत्याच्या घरात सुख, शांती आणि समृध्दी राहते. सहाजिकच असे म्हटले जाते की, या नात्याचे महत्त्व समजून घेताना नेहमीच ते नाते आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही गोष्टींमुळे पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. म्हणून दाम्पत्यामध्ये ‘या ‘ गोष्टी कधीही दरम्यान येऊ देऊ नयेत.
आदर आणि सन्मानाचा अभाव
आर्य चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीच्या नात्यात आदर हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. म्हणून दोघांनीही नेहमीच एकमेकांचा आदर केला पाहिजे. या गोष्टीचा अभाव नात्यात तणाव आणि मतभेद निर्माण करतो.
संवादाचा अभाव
चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीने नेहमीच संवादातून तोडगा काढला पाहिजे. परिस्थिती काहीही असो, संभाषण सुरूच ठेवले पाहिजे. ज्या दाम्पत्यामधील संवाद संपुष्टात येऊ लागतो, त्या नात्यातील धागे दुर्बल होऊ लागतात.
प्रेमाचा अभाव
चाणक्य म्हणतात की, नवरा-बायकोच्या नात्यात प्रेमाला विशेष स्थान असते. जेव्हा पती-पत्नीमध्ये प्रेम नसते तेव्हा अशांतता निर्माण होण्यास सुरुवात होते. नाती दुर्बल होण्यापासून वाचवण्यासाठी या नात्यात प्रेम असणे आवश्यक आहे.