इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतयी संघाने ४८.१ ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून पूर्ण करत २६७ धावा केल्या. विराट कोहलीने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने ९८ बॉलमध्ये ८४ रन्स केल्या. विराटच्या या खेळीत ५ चौकार लगावले. तसेच श्रेयस अय्यरसह इतरांनीही विजयात निर्णायक योगदान दिले. भारतीय संघाने या स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियावर विजय मिळवते भारतीय संघाने २०२३ वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा वचपाही काढला.
भारतीय संघाची सुरुवात फारशी बरी झाली नाही. अगोदर ५० धावांच्या आत २ मोठे झटके दिले. ऑस्ट्रेलियाने शुबमन गिल आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा या दोघांना आऊट केले. पण, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरत ९१ धावांची भागीदारी केली. श्रेयस आऊट झाल्यानंतर अक्षर पटेलने २७ रन्स केले. अक्षरनंतर केएल राहुल मैदानात आला. विराट आणि केएल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४७ रन्स केले. त्यानंतर विराट मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. विराट आऊट झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. त्याने ३ षटकार आणि १ चौकारासह २४ चेंडूत २८ धावा करुन तो आऊट झाला. हार्दिकनंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने ४८ व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि केएलला स्ट्राईक दिली. केएलने ४९ व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये गेला. या सामन्यात नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर कूपर कॉनोली आणि बेन द्वारशुइस या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
तर भारतीय संघातर्फे गोलंदाजी करतांना शमीने तीन, वरुण चक्रवर्ती आणि डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेटस घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव ४९.३ षटकात २६४ वर आटोपला.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.