इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने रविवारी दुबईत न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात न्यूझीलंडने २५२ धावांचे आव्हान भारतीय संघाला दिले होते. ते भारतीय संघाने ६ विकेट्स गमावून ४९ ओव्हरमध्ये पूर्ण करत २५४ धावा केल्या. भारतीय संघाने ही चॅम्पियन्स ट्रॉफी तिस-यांदा जिंकून न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला. भारतीय संघाने याआधी २००२ (संयुक्त विजेता) आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी करत वर्ल्ड रेकॅार्ड केला. आतापर्यंत एकाही संघाला ३ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
या सर्व कामगिरीतून भारतीय संघाला आयसीसीकडून २० कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे ३० लाख रुपये मिळणार आहे. याशिवाय भारतीय संघाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये सुध्दा मिळणार आहे.
तर उपविजेत्या न्यूझीलंडला ९.६२ कोटी रुपये मिळाले आहे. तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी ४.८६ कोटी रुपये मिळाले आहे. तसेच पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील अफगाणिस्तान आणि बांगलादेशला ३.०४ कोटी रुपये मिळाले. तर सातव्या आणि आठव्या स्थानकावरील पाकिस्तान आणि इंग्लंडला १.२१ कोटी रुपये मिळाले.
या स्पर्धेतील प्रत्येक विजयामुळे संघाला २९.५ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक संघाला किमान १.०८ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीने ५९.९ कोटी रुपयांचा बक्षीस निधी राखीव ठेवला होता. २०१७ च्या तुलनेत बक्षीस रक्कमेत ५३ टक्के वाढ करण्यात आली आहे.