चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चाळीसगाव-नागद रस्त्यालगत गुप्तधनासाठी अघोरी पूजा करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि याठिकाणाहून ९ जणांना अटक केली आहे. त्यातील ५ जण नाशिकचे आहेत.
याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये ५ जण नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यात अरुण जाधव (४२,आसरबारी, पेठ, नाशिक), विजय बागूल (३२, जेल रोड, नाशिक), राहुल याज्ञिक (२६, ननाशी, दिंडोरी, नाशिक), अंकुश गवळी (२१, जोरपाडा, दिंडोरी, नाशिक), संतोष वाघचौरे (४२, अशोकनगर, नाशिक) या पाच जणांचा समावेश आहे.
चाळीसगाव जवळ नागद रस्त्यालगत असलेल्या शेतातील पडीक घरात हा प्रकार सुरू होता. आज आषाढ अमावास्या असल्याने गुप्तधनासाठी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर चाळीसगाव पोलीसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. अघोरी पूज करणा-यांकडून चाळीसगाव पोलिसांनी मोबाईल, मानवी कवटी, लिंबू, नारळ, रुद्राक्ष माळसह पूजासाहित्य असा सुमारे ८ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.