चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत चाळीसगावमध्ये २२ लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. तालुक्यात मोठ्याप्रमाणावर राज्यात बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी जळगाव दौरा करत अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अविनाश दाभाडे व जळगाव कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांचे पथक तयार करून चाळीसगाव येथील प्लॉट नंबर २७ a, MIDC चाळीसगाव येथील गोडावून वर छापा घातला.
या छाप्यामध्ये गोडाऊन मध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा विक्री करितासाठविलेला मिळून आला. घटनास्थळी पोलिस बोलावून सदरील मालाची मोजदाद केली असती तब्बल २२ लाख ४१ हजार ८०० रुपये किमतीचा ६१ पोते विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा मिळुन आला. प्रशासनाचे पथकाने सदरील साठा जप्त करुन गोडवून सील केले.
सदर प्रकरणी दत्तू लालदास बैरागी वय २९ वर्षे राहणार चाळीसगाव या इसमाचे विरोधात भा. दं. वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील प्रतिबंधित साठा पुरवठादार, उत्पादक यांचा शोध चाळीसगाव पोलिस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई नाशिक गुप्तवार्ताचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, जळगाव यांचे पथकाने केली असून पुढील तपास चाळीसगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
Chalisgaon City FDA Raid Panmasala Seized