चैत्रगौरी
गुढीपाडवा झाला की वेध लागतात ते चैत्र गौरीचे. चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी चैत्र गौरीची स्थापना केली जाते. पुढे महिनाभर म्हणजे अक्षयतृतीयेपर्यंत चैत्रगौरी पूजन केले जाते.
चैत्र गौरी पूजन विधी
छोट्या पितळेच्या अथवा लाकडी पाळण्यामध्ये फुलांची तसेच दागिन्यांची सजावट करून चैत्र गौरीची स्थापना केली जाते. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा हीच चैत्र गौरी म्हणून पूजा केली जाते. चैत्रगौरी हे देवी पार्वतीचे रूप आहे असे मानले जाते. चैत्रात येणाऱ्या सुंदर सुवासिक विविध रंगी फुलांची तसेच रांगोळ्यांनी सजावट करून देवीची खण व नारळ याने ओटी भरली जाते.
एक खण पाळण्यावर म्हणजे देवीचे डोक्यावर दिला जातो. देवीची शोडषोपचारे पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णा ची आरती केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवून देवीला स्थानापन्न केले जाते. महिनाभर रोज फुलांच्या माळा, सुगंधी अत्तर, त्याचप्रमाणे खरबूज, टरबूज, खीरा, काकडी, द्राक्ष यांचा नैवेद्य दाखवला जातो. दररोज सायंकाळी देवीची आरती केली जाते. अखंड नंदादीप लावला जातो या काळात
कुमारिका पूजन यास विशेष महत्त्व असते.
कैरीच्या डाळीचा नैवेद्य
अक्षय तृतीया ला हळदीकुंकू समारंभ केला जातो यावेळी सुवासिनींची हळद कुंकू लावून ओटी भरली जाते. त्यावेळी कैरीची डाळ व कैरी पन्हे खाण्याचा आनंद काही औरच असतो.