नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एप्रिलमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर देशातील दिल्ली, यूपी, महराष्ट्रासह सहा राज्यांमधील १५ शहरे होती. या शहरांची रेकी करून सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवादी रचत होते. यासाठी वेगवेगळे संशयित आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर वेगवेगळी कामे सोपविण्यात आली होती, असा खुलासा या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान झाला आहे. चौकशी करणा-या वरिष्ठ अधिका-यांनी ही माहिती दिली.
संशयित आरोपी ओसामा २२ एप्रिल २०२१ रोजी सलाम एअर या विमानाने लखनऊहून मस्कत, ओमानकडे रवाना झाला होता. तिथे त्याची प्रयागराजचा (अलाहाबाद) रहिवासी जिशानशी भेट झाली. तो पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी भारतातून ओमानला पोहोचला होता. त्याच्यासोबत १५-१६ बांगलाभाषी लोकही सहभागी झाले होते. त्यांना वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले. जिशान आणि ओसामाला एका गटात ठेवण्यात आले. नंतर काही दिवसांत ते समुद्रावाटे प्रवास करून कराची येथे गेले. नंतर पाकिस्तानातील ग्वादर बंदराजवळील जियोनी येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे एका पाकिस्तानी व्यक्तीने स्वागत केले. नंतर तो व्यक्ती त्यांना थट्टा येथे एका फार्म हाउसमध्ये घेऊन गेला. फार्म हाउसमध्ये तीन पाकिस्तानी नागरिक होते. त्यापैकी दोघे जब्बारंद हमजा याने त्यांना प्रशिक्षण दिले. हे दोघेही पाकिस्तानी लष्कराशी संबंधित होते. त्यांनी लष्कराची वर्दी परिधान केली होती. त्यांनी दैनंदिन वस्तूंपासून बॉम्ब आणि आयईडी बनविण्याचे तसेच जाळपोळ करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांना लहान हत्यारे आणि एके-४७ सांभाळणे आणि त्याचा उपयोग करण्याचे प्रशिक्षणही दिले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण जवळपास १५ दिवसांपर्यंत सुरू होते. त्यानंतर त्यांना त्याच मार्गाने मस्कत येथे नेण्यात आले. तेथून त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये पोहोचून आपले गुप्त काम सुरू केले होते.
असा झाला मॉडेलचा पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून इनपूट मिळाले, की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अंडरवर्ल्ड मिळून तयार करण्यात आलेले मॉडेल भारतात मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचत आहे. त्यासाठी त्यांना सीमेपलिकडून स्फोटकांची व्यवस्था करून दिली जात आहे. याच इनपूटच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिल्लीतील ओखला परिसरात आणि महाराष्ट्रात या मॉडेलचे महत्त्वाचे काम करणा-या संशयितांवर लक्ष केंद्रित केले. यूपी आणि महाराष्ट्रासह देशातील विविध भागात त्यांच्या साथीदारांवर नजर ठेवण्यात आली. अनेक पथकांना मुंबई, लखनऊ, प्रयागराज, रायबरेली, प्रतापगडमध्ये तैनात करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारावरून विविध राज्यांमध्ये एकत्रितरित्या छापेमारी करण्यात आली. तेव्हा दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेला अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालियाला राजस्थानच्या कोटा शहरातून अटक करण्यात आली. ओसामाला दिल्लीतील ओखलामधून, मोहम्मद अबू बकर याला दिल्लीतील सराय काले खाँ येथून आणि जिशानला यूपीच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्याशिवाय मोहम्मद आमीर जावेदला लखनऊ आणि मूलचंद ऊर्फ साजू ऊर्फ लाला याला रायबरेली येथून अटक करण्यात आली होती.