मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना मुंबईत घडल्याने सर्वत्र उडाली आहे. मुंबईत सीबीआयने केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात (सीजीएसटी) कर चुकवेगिरी विरोधी विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या धीरेन्द्र कुमार विरोधात एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीबीआय त्याचा शोध घेत आहे.
सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभाग ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते, ही संपूर्ण देश तिचे कार्यक्षेत्र आहे. पण या सीबीआयवर दुसऱ्याच एका शासकीय विभागातील अधिकाऱ्याची चौकशी करण्याची वेळ आली आहे. कारण हा अधिकारी २५ लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांने व्यापाऱ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती.
मागील वर्षी करचुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात सीजीएसटी कार्यालयाच्या मुंबई विभागाने सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून कडक कारवाई करण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत, मागील वर्षी सीजीएसटी मुंबईच्या दक्षिण क्षेत्र आयुक्तालयाने आतापर्यंत सुमारे ५७० कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणून ७ कोटी रुपये वसूल केले.सुमारे १५ जणांना संबंधित प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांनी सीजीएसटी विभागाचा धसका घेतला होता, त्याचा फायदा या भागातील एका अधिकाऱ्यांनी घेतला.
मुंबई मधील श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला धमकी देऊन सीजीएसटीच्या कार्यालयात आणले. तिथे त्याला ५ तास बसवून ठेवून त्याला अटक करण्याची भिती दाखविली. तसेच अटकेची कारवाई टाळायची असेल तर त्याने त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. तसेच ताबडतोब पैसे आण असे सांगितले
घाबरलेल्या व्यापाऱ्याने कसेबसे त्याला ५० लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे ५० लाखांपैकी २५ लाख आता दोन तासांत देतो आणि उरलेले २५ लाख उद्या सकाळी देतो, असे सांगितले.
या पैशांची व्यवस्था करण्यासाठी एका मित्राला फोन करू देण्याची विनंती या व्यापाऱ्याने धीरेन्द्र कुमारला केली. त्यामुळे व्यापाऱ्याने व्हॉटस्ॲपवरून आपल्या मित्राला फोन केला आणि पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र लाचखोरीसंदर्भातील हे बोलणे त्याच्या मित्राने गुपचुप व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. दरम्यान, २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळताच धिरेंद्र कुमारचे बाइकस्वार पसार झाले.
त्यानंतर या प्रकरणी आता हा व्हिडीओ तसेच या व्यापाऱ्याला जारी केलेल्या समन्सवर असलेली धीरेन्द्र कुमारची स्वाक्षरी, या व्यापाऱ्यासोबत कार्यालयात येतानाचे सीसीटीव्ही फुटेज अशा गोष्टींची पडताळणी करून सीबीआयने धीरेन्द्र कुमार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनेक अधिकारी लाचेचे पैसे स्वतः स्वीकारत नाहीत. त्याकरिता त्यांची खास माणसे नेमलेली असतात. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला आहे.
CGST Superintendent Corruption Bribe CBI Action