मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीजीएसटी मुंबई विभागाने “बनावट नोंदणींविरुद्धच्या दुसऱ्या विशेष अखिल भारतीय मोहिमेदरम्यान” दोन मोठी बनावट ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (आयटीसी) रॅकेट उध्वस्त केली. या मोहिमेमध्ये १४० कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये एकूण ७६० कोटी बनावट पावत्या जारी करण्यात आल्याचे दिसून आले. सरकारी तिजोरी संदर्भात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विस्तृत शोध मोहिमेनंतर आणि तपासानंतर, असे आढळून आले की, दोन रॅकेटच्या सूत्रधारांनी ९२ संशयास्पद कंपन्यांच्या मार्फत फसवणूक करून आयटीसीचा लाभ घेण्यासाठी बनावट पावत्या तयार केल्या आहेत. ज्याद्वारे फसव्या आयटीसी द्वारे त्यांच्या विविध प्राप्तकर्त्यांना मालाची, प्रत्यक्षात देवाण-घेवाण न करताच कागदोपत्री माल दिल्याचे दाखवले. या कारवाईविषयी सीजीएसटीच्या मुंबई विभागाचे मुख्य आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त दिपीन सिंगला यांनी माहिती दिली.
याप्रकरणी ठाणे सीजीएसटी आयुक्तालयांतर्गत हितेश शांतीलाल वसा या सूत्रधाराला १० ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली आहे. हितेश याने २२ ‘नॉन-बोनाफाईड फर्म’ /कंपन्यांची नोंदणी केली आहे. ४८ कोटींची आयटीसी प्राप्त करण्यात आणि ४४ कोटी रूपयांची आयटीसी वळवण्यात अशा प्रत्यक्षात वस्तू/सेवांची कोणतीही देवाण-घेवाण न करता एकूण ९२ कोटीच्या प्रकरणात त्याचा हात होता. या ‘वास्तव नसलेल्या कंपन्यांची उलाढाल वाढवण्यासाठी तो चक्राकार व्यापारातही सामील होता. तसेच त्याने जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी आणि बँक खाती उघडण्याच्या उद्देशाने इतर व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्ड इ. ‘केवायसी’ कागदपत्रांचा गैरवापर केला. सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत त्याला अटक करण्यात आली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात, पालघर सीजीएसटी आयुक्तालयाने, ३२० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता आयटीसी मिळवण्याच्या उद्देशाने २२ कोटी आणि ७० ‘बनावट कंपन्यांचा वापर करून वस्तू/सेवांची प्रत्यक्षात देवाणघेवाण न करता २६ कोटी रुपयांचा आयटीसी वळवणे असे एकूण ४८ कोटी रुपयांचे रॅकेट होते. या रॅकेटचा सूत्रधार अशोक हरिलाल ओझा आहे. त्याला १० ऑक्टोंबर रोजी अटक करून १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.