नवी दिल्ली – कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळणार्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. मानसिक आणि शारिरीकरित्या सक्षम नसलेल्या मुलांना किंवा भावा-बहिणींना कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्यासाठी उत्पन्नाच्या निकषात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी मुले किंवा भाऊ-बहीण आयुष्यभर निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतील. कौटुंबिट निवृत्तीवेतनाशिवाय इतर स्त्रोतांकडून मिळणारे एकूण उत्पन्न कौटुंबिक निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल, म्हणजेच मृत सरकारी कर्मचार्याला मिळालेल्या अंतिम वेतनाच्या ३० टक्के आणि संबंधित निवृत्तिवेतनधारकांना त्यावरील स्वीकारार्ह महागाई भत्ता असे मिळून निवृत्तीवेतन मिळेल. अशा प्रकरणांमध्ये ८ फेब्रुवारी २०२१ पासून लाभ मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीत दिव्यांग मुले किंवा भाऊ-बहीण कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र आहेत. जर त्यांना कौटुंबिक निवृत्तीवेतनाशिवाय इतर उत्पन्नासह एकूण उत्पन्न ९ हजार रुपयांवर असेल तर त्यांना महागाई भत्ता मिळत नाही.
यापर्वी बँक कर्मचार्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या दृष्टीने इंडियन बँकिंग असोसिएशनच्या कुटुंबांना निवृत्तीवेतनासाठी अंतिम वेतनाच्या ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बँक कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना प्रतिकुटुंब ३० हजार रुपयांवरून ३५ हजार रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन मिळणार आहे.
११ नोव्हेंबर २०२० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांशी वेतन संशोधनाचा ११ वा द्विपक्षीय करार करण्यात आला होता. इंडियन बँक असोसिएशनसह (आयबीए) कर्मचारी संघटनांनी त्यावर स्वाक्षर्या केल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कौटुंबिक निवृत्तीवेतन वाढविण्याचा तसेच नियोक्त्यांचे योगदान वाढविण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.
पूर्वी या योजनेत निवृत्तीवेतनधारकांच्या अंतिम वेतनाच्या १५, २० आणि ३० टक्क्यांचा स्लॅब होता. त्याची मर्यादा जास्तीत जास्त ९,२८४ रुपये होती. ही रक्कम खूपच किरकोळ होती. एवढेच नव्हे तर सरकारने नवीन निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नियोक्त्यांच्या योगदानाला सध्याच्या दहा टक्क्यावरून वाढवून १४ टक्के करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.